मुंबई - शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता भासत आहे. रुग्णांना बेड्स मिळावे आणि त्यांच्यावर उपचार करता यावेत म्हणून पालिकेने खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने जसलोक या सुपर स्पेशालिटी खासगी रुग्णालय १०० टक्के कोरोना रुग्णालय करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे ४० आयसीयूसह २५० बेड वाढणार होते. मात्र, आपल्या निर्णयावरून पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी माघार घेतली आहे. यामुळे आता २२७ पैकी पालिकेला १७५ बेड्स मिळणार आहेत. त्यात २७ आयसीयूचा समावेश आहे. एकूण बेडच्या ७७ टक्के बेड पालिकेला कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मिळणार आहेत.
कोरोना रुग्णालयात रूपांतर -
मुंबई गेल्यावर्षी कोरोनाचा प्रसार होत असताना जसलोक रुग्णालय प्रशासनाने कोरोना रुग्णांसाठी बेडची सुविधा देण्यास सुरुवात केली होती. ही सेवा देताना जसलोकमधील डॉक्टर, परिचारिका तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र, कोरोनाला रोखण्यासाठी जसलोक रुग्णालयाने नेहमीच सहकार्य करून योगदान दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी जसलोक रुग्णालयांचे रूपांतर पूर्णपणे कोरोना रुग्णालयात करण्याचा निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करा, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र रुग्णालय प्रशासनाने सर्व बेड्स ताब्यात घेण्यास विरोध दर्शवला होता. रुग्णालयाच्या विरोधानंतर पालिका आयुक्तांनी जसलोक रुग्णालय १०० टक्के कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. महापालिका जसलोक रुग्णालयातील २२७ पैकी १७५ बेड ताब्यात घेणार आहे. त्यात २७ आयसीयूचा समावेश आहे.