मुंबई -कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. नागरिकांना लॉकडाउनमधून सूट दिली जात आहे. त्याचा गैरवापर केला जात आहे. मुंबईतील नाईट क्लबमध्ये लोक विनामास्क धांगडधिंगाणा घालत आहेत. लोअर परळ आणि वांद्रेमधील कल्बमध्ये सुमारे दोन हजार लोकांनी पालिकेच्या मार्गदर्शन तत्वांचे उल्लंघन केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून २० डिसेंबरपर्यंत यात सुधारणा झाली नाही, तर रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लावणार, असा इशारा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिला आहे.
हेही वाचा -बॉक्सिंग डे कसोटीला दररोज असणार ३०,००० प्रेक्षक!
मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आहेत. परंतु, ४४ टक्के हायरिस्क कॉंन्टॅक्ट आहेत. कोरोनाचा धोका वाढण्याची संभाव्य शक्यता यामुळे नाकारता येत नसल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. अशातच आता मुंबईतील नाईट क्लबकडून कोरोना संदर्भातील मार्गदर्शन तत्वांचे पालन केले जात नसल्याची बाब उघड झाली. शिवाय, रात्री ११ पर्यंत क्लब बंद करणे बंधनकारक असताना हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. पालिकेकडे यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर गेल्या शनिवारी रात्री १२ वाजता परळच्या एपिटोम नाईट क्लबमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. येथे सुमारे दोन हजार नागरिक विनामास्क रात्री उशिरापर्यंत एकत्र आल्याचे दिसून आले. त्यांच्यावर पालिकेने नियमानुसार कारवाई केली. मात्र इतके लोक तेही विनामास्क एकत्र आल्याने कोरोना संसर्ग वाढू शकतो. याची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला याबाबत पत्र पाठवल्याची माहिती, पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली. तसेच मुंबईतील सर्व नाईट क्लबवर आता पालिकेची नजर असणार आहे. येत्या २० डिसेंबरपर्यंत नाईट क्लबने सुधारणा केली नाही तर नाईलाजाने रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लावला जाईल, असा इशाराही आयुक्त चहल यांनी दिला आहे.