मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. मात्र, यावर्षी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्यास नकार दिला आहे. तसेच, मंडळाच्या 10 कार्यकर्त्यांना विसर्जन स्थळी मूर्ती घेऊन येण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, अशी परवानगी देण्यात आली असली, तरी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मूर्ती पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार आहे. पालिका कर्मचारी मूर्त्यांचे विसर्जन करणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त हर्शद काळे यांनी दिली आहे.
पालिकेकडे मूर्ती सुपूर्द करावी लागणार -
मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आज पालिका प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळ तसेच समन्वय समिती यांची बैठक पालिकेच्या परेल येथील कार्यालयात झाली. या बैठकीदरम्यान समन्वय समितीने विसर्जनस्थळी कार्यकर्त्यांना जाण्याची मागणी केली आहे. त्यानुसार मंडळाचे 10 कार्यकर्ते मंडपापासून विसर्जन स्थळापर्यंत मूर्ती घेऊन येतील. विसर्जनस्थळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मूर्ती सुपूर्द करतील. त्यानंतर पालिका कर्मचारी मूर्तीचे विसर्जन करतील. गर्दी होण्याची शक्यता असल्याने, ऑफलाईन दर्शनाची परवानगी देण्याबाबत राज्य सरकारच्या आदेशाने योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काळे यांनी यावेळी दिली आहे.