मुंबईत पावसाचा कहर; नायर रुग्णालयाच्या कोव्हिड विभागात शिरले पाणी; रुग्णांचे हाल
मुंबईत मंगळवारी रात्री पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नायर रुग्णालयाच्या कोव्हिड सेंटरच्या ओपीडीमध्ये पाणी शिरल्याचा प्रकार घडला आहे.रुग्णालयाय समोरील परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. परिणामी रुग्णालयात पाणी शिरल्याने कोरोना संबंधित तपासणी सध्या बंद आहे. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबई - राज्याची राजधानी मुंबईमध्ये मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईतील सखल भागात मोठ्या प्रमाणात साचले असून महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयालाही याचा फटका बसला आहे. या रुग्णालयात पावसाचे पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे रुग्णालयातील कोव्हिड विभागाची ओपीडीही पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे रुग्णांच्या तपासणीपासून ते चाचणीपर्यंत सर्व सेवा ठप्प असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. दरम्यान रुग्णालया समोरच्या रस्त्यावरही पाणी असल्याने रुग्ण वा इतर कुठलीही वाहने रुग्णालयापर्यंत येऊ शकत नाही. त्यामुळे कोव्हिड रुग्णांना इतरत्र हलवणेही शक्य नाही.