मुंबई -देशभरात दिवसेंदिवस होत चाललेली इंधन दरवाढ लक्षात घेता भविष्यात इंधनावरील वाहनांना प्रदूषणविरहित आणि बचतीचा योग्य पर्याय म्हणून शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेच्या पुढाकाराने आणि ए व्ही मोटर्स यांच्या माध्यमातून आज (मंगळवार) मुंबईतील पहिले ई-ऑटोरिक्षा विक्री दालन सुरू करण्यात आले. शिवसेना नेते, माजी मंत्री, खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते पियाजो अॅपे कंपनीच्या प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्ही वर्गावारीतील ई-ऑटोरिक्षा वाहनांचे अनावरण आणि वाहने खरेदी केलेल्या ग्राहकांना चाव्यांचे वितरण यावेळी करण्यात आले.
ई-ऑटोरिक्षा वाहन खरेदीवर विशेष सवलत -
केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशात आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाने देखील ई-वाहन धोरणास यापूर्वीच मान्यता दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक आणि ग्राहकांची आर्थिक बचत या सर्व दृष्टीने विचार करता शासन देखील याकरीता विविध स्तरावर प्रोत्साहन आणि अनुदान उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेतील गरज लक्षात घेता मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमधील प्रवासी आणि मालवाहतूक रिक्षाचालकांचे लक्ष वेधण्यासाठी शिव वाहतूक सेनेने संघटनेच्या सदस्य ऑटोरिक्षा चालकांनादेखील या ई-ऑटोरिक्षा वाहन खरेदीवर विशेष सवलतीचा लाभ देऊ केला आहे.