मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपांप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने यासंबंधित किल्ला कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर कोर्टाने परमबीर सिंग यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.
हेही वाचा -शाहरूखने आर्थर रोड तुरुंगातून आर्यनाला घरी आणण्याची जबाबदारी सोपवलेली तो 'रवी' कोण ? वाचा...
परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. यानंतर परमबीर सिंग बेपत्ता झाले.
लेटर बॉम्बनंतर मुंबई, ठाणेसह इतर शहरांमध्ये खंडणी आणि धमकावल्याचे गुन्हे परमबीर सिंग यांच्यावर दाखल झाले होते. या प्रकरणाची मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत आहेत. मात्र, परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा कोणालाच माहिती नाही. त्यामुळे अखेर मुंबई गुन्हे शाखेने मुंबईच्या किल्ला कोर्टात धाव घेतली. परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची याचिका दाखल केली होती.
- परमबीर सिंग यांचे वेतन थांबवले -
परमबीर सिंग हे कुठे आहेत याबाबत पोलीस विभाग तसेच राज्य सरकारला कोणतीही माहिती नाही. कोषागार विभागाने याबाबत गृह विभागाला माहिती दिली असून याबाबत पोलीस महासंचालक यांना ही माहिती देण्यात आली आहे. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत गृह विभागाने सिंह यांचे वेतन रोखण्याबाबत पत्र दिले असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा -परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ठाणे न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी