मुंबई - राज्याच्या राजधानीत प्रवास करण्यासाठी रेल्वे आणि बेस्टला प्राधान्य दिले जाते. रेल्वेला मुंबईची लाईफलाईन तर बेस्टला मुंबईची दुसरी लाईफलाईन बोलले जाते. बेस्टच्या ताफ्यात एकाच वेळी जास्त प्रवासी ने-आण करण्याची क्षमता असलेल्या १२० डबल डेकर बसेस आहेत. मात्र या बसचे आयुर्मान संपल्याने येत्या ३१ मार्च पर्यंत भंगारात काढल्या जाणार आहेत. यामुळे बेस्टची शान असलेल्या या बसेस लवकरच इतिहास जमा होणार आहेत.
बेस्टची शान असलेली 'डबल डेकर बस' होणार इतिहास जमा - मुंबईतील डबल बसची सेवा थांबणार
मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या डबलडेकर बसेस नव्याने घेण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांकडे नवीन डबलडेकर बसेस घेण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असून महाव्यवस्थापकांची आणि बेस्ट समितीची मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
१८७३ मध्ये बॉम्बे विद्युत पूरवठा आणि ट्रामवेज कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीद्वारे मुंबईत ट्रामच्या माध्यमातून परिवहन सेवा दिली जात होती. पुढे या कंपनीचे रुपांतर बेस्ट उपक्रमात झाले. १९३७ मध्ये ट्रामच्या डबल डेकर बसेस सुरू करण्यात आल्या. १९४७ पर्यंत त्यांची संख्या २४२ पर्यंत गेली होती. मात्र त्यानंतर या डबल डेकर बसमध्ये वेळोवेळी बदल होत गेले. सध्या बेस्टकडे सध्या रस्त्यावर दिसणाऱ्या १२० डबलडेकर बसेस आहेत. परंतु आता या बसचे आयुर्मान संपल्याने त्या मार्च २०२१ पर्यंत भंगारात काढण्यात येणार आहेत.