मुंबई - गेल्या सहा महिन्यांपासून उपासमारीला सामोरे जावे लागलेल्या मुंबई डबेवाहतूक मंडळाने शुक्रवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची आणि डबेवाल्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याच्या मागणीसोबतच डबेवाल्यांच्या बोगस संस्थांना आवर घालण्यासाठी सहकार्य करावे, अशा विविध मागण्या राज ठाकरे यांच्याकडे केल्या.
मुंबईचा डबेवाला पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला.. मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन - राज ठाकरे बातमी
मुंबई डबेवाहतूक मंडळाने लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्यासह आपल्या अन्य मागण्यांसाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. डबेवाल्यांच्या सर्व मागण्या सरकारपर्यंत लवकरच पोहोचवून सर्वच बाबतीत मनसे कायम डबेवाल्यांच्या सोबत राहील, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे.
राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट झाली. मुंबई डबेवाहतूक मंडळाचे अध्यक्ष उल्हास मुके, रामदास करवंदे व कार्याध्यक्ष सोपानकाका मरे यांच्या नेतृत्वाखाली डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंना डबेवाल्यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे. यावेळी तुमच्या सर्व मागण्या सरकारपर्यंत लवकरच पोहोचवून, सर्वच बाबतीत मनसे कायम डबेवाल्यांच्या सोबत राहील, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले असल्याचे कार्याध्यक्ष सोपान काका मरे यांनी सांगितले.
मनसेने लोकल सेवा सुरू करण्यासाठी पुकारलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाला मुंबई डबेवाला संघटनेचा बिनशर्त पाठिंबा असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. शिवाय, कोरोना संकटात विविध संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून मुंबई डबेवाल्यांसाठी मिळालेली आर्थिक मदत बोगस संस्थेने लाटली असून अद्याप डबेवाल्यांपर्यंत मदत पोहोचली नाही. अशा बोगस संस्थांना आवर घालण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. तसेच, मोफत बाईक देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील कारवाई होत नसल्याची खंत डबेवाल्यांनी यावेळी राज ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली.