मुंबई -गेल्या अकरा महिन्यात पालिका आणि आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना विषाणूचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र गेल्या काही दिवसात कोरोनाच्या प्रसारात वाढ पाहायला मिळाली आहे. त्यासाठी लग्न समारंभासह क्लब, उपहारगृहे, होम क्वारंटाईन इतर खासगी कार्यक्रमाच्या ठिकाणी नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. आयुक्तांच्या निर्देशानंतर अशा कार्यक्रम ठिकाणी धाडी टाकून कारवाईची कठोर अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे. याशिवाय मास्कचा उपयोग न करणाऱ्या नागरिकांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. यासाठी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये ३०० मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
आढावा बैठकीत निर्देश -
मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना रुग्णांची संख्या आता दुपटीने वाढली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्य़ाने पालिका सतर्क झाली असून कठोर नियमांची अंमलबजावणी सुरु केली आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सार्वजिनक ठिकाणी गर्दी वाढते आहे. लग्न समारंभासह इतर सार्वजिनक ठिकाणी गर्दी वाढते आहे. यावेळी सोशल डिस्टनसिंग, मास्कचा वापर न करणे आदी नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना निर्धारित वेळेत मुंबई लोकल सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्याही वाढली आहे. अनेक ठिकाणी होम क्वारंटाईनचे नियमही धाब्यावर बसवले जात आहेत. यावर आता नजर ठेवली जाणार असून नियम मोडणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. चहल यांनी गुरुवारी महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे बैठक घेतली. त्यावेळी परिस्थितीचा आढावा घेवून यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले.
विनामास्क रेल्वे प्रवाशांवर होणार कारवाई -
लोकमधून विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली असून यापुढे मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी ३०० मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यक भासल्यास मार्शलच्या संख्या दुप्पट वाढवली जाणार आहे. रोज २५ हजार जणांवर कारवाईचे लक्ष्य पालिकेसमोर असणार आहे.
एकाचवेळी ५० पेक्षा अधिक व्यक्ती दिसल्यास दंडात्मक कारवाई -
लग्न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना, क्लब्ज, नाईट क्लब्ज, उपहारगृहे, चित्रपटगृहे, सर्वधर्मिय स्थळे, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक आहे. अशा ठिकाणी धाडी टाकल्या जाणार आहेत. येथे एकाचवेळी ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास व मास्कचा वापर होत नसल्यास संबंधित व्यक्तिंना दंड करण्यासोबत त्या-त्या ठिकाणच्या आस्थापनांवर, व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
इमारतींमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास सील -
ज्या रहिवासी इमारतींमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळतील अशा इमारती सील केल्या जाणार आहेत. अशा इमारतींवर पालिकेचा वॉच राहणार आहे. याबाबत संबंधित सोसायट्यांना पालिकेकडून सूचना दिल्या जाणार आहेत.
प्रत्येक रेल्वे लाईनवर १०० मार्शल -