मुंबई -गेल्यावर्षी ऐन लग्नसराईच्या काळात आलेली कोरोनाची साथ आल्याने धुमधडाक्यात लग्न करू इच्छिणाऱ्या अनेक तरुण तरुणींच्या स्वप्नांवर विरजण पडले. मात्र, यंदाही कोरोनाची दुसरी लाट आणि आता तिसऱ्या लाटेची संभावना असल्याने शुभमंगल करू इच्छिणाऱ्या मुंबईकर तरुणांनी 'सावधान' भूमिका घेत कमीत-कमी खर्चात रजिस्टर लग्नाचा पर्याय स्वीकारला आहे. जानेवारी ते सप्टेंबर महिन्यापर्यत मुंबई शहरात ९४५ तरुणांनी लग्न हे रजिस्टर पद्धतीने केले आहे.
तरुणांनी निवडला रजिस्टर लग्नाचा पर्याय-
लग्न म्हटले की, प्रत्येक तरुण तरुणीचा जिव्हाळ्याचा क्षण. हा क्षण विशेष करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवली जाते. मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. प्रत्येक तरुण-तरुणीचे स्वप्न असते की आपले लग्न धुमधडक्यात करावे. मात्र, गेल्या वर्षभरापासून अनेकांच्या लग्नावर कोरोनामुळे विरजन पडले आहे. गेल्यावर्षी ऐन लग्नसराईच्या काळात आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे आणि लॉकडाऊनमुळे धुमधडक्यात लग्न करण्याचे अनेक जणांचे स्वप्न धुळीस मिळाले होते. यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे लग्न करू इच्छिणार्या अनेक तरुण-तरुणींना लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली होती. पुन्हा एकदा कोरोनाचा तिसऱ्या लाटेची संभाव्यता शासनाकडून व्यक्त केली जात आहे. याशिवाय कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून आर्थिक परिस्थितीही नाजूक आहे. यामुळे मुंबईकर तरुणांनी लग्नासाठी रजिस्टर मॅरेजचा पर्याय स्वीकारला आहे. गेल्या वर्षभरात मुंबई शहरात तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक रजिस्टर लग्नाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या नऊ महिन्यात ९४५ लग्न हे रजिस्टर पद्धतीने झाली आहेत.
रजिस्टर लग्नांची संख्या पाच वर्षांत सहा हजारांवर-
गेल्या काही वर्षांपासून लव्हमँरेज करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. कोरोनामुळे सुद्धा लग्न सोहळ्यांवर शासनाकडून काही निर्बंध लावले आहेत. परिणामी अनेकांनी रजिस्टर लग्नांचा पर्याय निवडला आहे. आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षात मुंबईत विवाह कार्यालयात ६ हजार ५९ लग्न रजिस्टर पद्धतीने झाले आहेत. कोरोना काळात रजिस्टर पद्धतीने लग्न करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ मध्ये मुंबई शहरात एकूण १ हजार ८१९ लग्नांची नोंद झाली आहे.