मुंबई- तौक्ते चक्रीवादळाने मुंबईला चांगलाच तडाखा दिला असून, पहाटेपासून सुरू असलेला धुंवाधार पाऊस व जोरदार वारे यांनी अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. मुंबईकरांनी घरातच थांबा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
दादर येथील हिंदमाता व लगतच्या परिसरात पावसाचे पाणी साचले असून वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई महापालिकेच्या रेस्क्यू टीम्स कार्यरत झाल्या असून ठिकठिकाणी पडलेले वृक्ष छाटणीचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना घरातच थांबण्याचे आवाहन केले असून सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने काळजी घ्यावी व अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, असे महापौरांनी म्हटले आहे.