महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईकरांची दुसऱ्या लाटेवर मात; २४ पैकी १८ विभागांत झोपडपट्ट्या, तर ११ विभागांत एकही इमारत सील नाही - Slum seal statistics mumbai

जगभरात कोरोनाचा प्रसार आहे. मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाली. मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आणि सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शहरातील सील इमारती आणि कंटेन्मेंट झोनची संख्या कमी झाली आहे. महापालिकेच्या हद्दीतील २४ विभागांपैकी १८ विभागातील झोपडपट्टीत एकही कंटेन्मेंट झोन नाही. तसेच, ११ विभागांमध्ये एकही इमारत सील नाही. यामुळे मुंबई आणि मुंबईकरांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरही मात केली आहे.

11 zones building not seal Mumbai
झोपडपट्ट्या सील आकडेवारी

By

Published : Jun 16, 2021, 7:24 PM IST

मुंबई - जगभरात कोरोनाचा प्रसार आहे. मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाली. मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आणि सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शहरातील सील इमारती आणि कंटेन्मेंट झोनची संख्या कमी झाली आहे. महापालिकेच्या हद्दीतील २४ विभागांपैकी १८ विभागातील झोपडपट्टीत एकही कंटेन्मेंट झोन नाही. तसेच, ११ विभागांमध्ये एकही इमारत सील नाही. यामुळे मुंबई आणि मुंबईकरांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरही मात केली आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी पालिकेकडून उपाययोजना सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

माहिती देताना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी

हेही वाचा -आशा स्वयंसेविका अन् आरोग्यमंत्री यांची बैठक निष्फळ, आंदोलन सुरू ठेवण्यावर कृती समितीचा ठाम

७ लाख १७ हजार ६८३ मुंबईकरांना कोरोना

मुंबईमध्ये ११ मार्च २०२० ला पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबई महापालिका आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आतापर्यंत ७ लाख १७ हजार ६८३ मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली आहे. १५ हजार २१६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ६ लाख ८४ हजार ८२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या १५ हजार ३९० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी ७०२ दिवसांवर पोहचला आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत एकूण ६६ लाख ६४ हजार ३२२ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

कंटेन्मेंट झोन -

कोरोना रुग्ण आढळून आल्यास ती चाळ कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केली जाते. तसेच, एखाद्या इमारतीत रुग्ण आढळून आल्यास तो मजला सील केला जातो. एखाद्या इमारतीमध्ये ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास ती इमारत सील केली जाते. एप्रिल दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ८० हून अधिक चाळी कंटेन्मेंट झोन म्हणून, तर ९०० हून अधिक इमारती सील करण्यात आल्या होत्या. रुग्णसंख्या कमी होत असल्याने सध्या १९ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर ८६ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत.

मुंबई महापालिकेचे २४ विभाग आहेत, त्यापैकी १८ विभागांत एकही कंटेन्मेंट झोन नाही. कुलाबा, फोर्ट, डोंगरी, चिराबाजार, काळबादेवी, ग्रँटरोड, शीव-वडाळा, किंग सर्कल, परळ, एल्फिन्स्टन, धारावी, दादर, माहीम, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कुर्ला, घाटकोपर, बोरिवली, दहिसर, गोरेगाव, मालाड, अंधेरी पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांमध्ये आता एकही कंटेन्मेंट झोन नाही. अंधेरी पूर्वमध्ये ८ कंटेन्मेंट झोन, कांदिवली ६, भांडूप ३, मुलुंड आणि चेंबूरमध्ये प्रत्येकी २ आणि भायखळा प्रभागातील झोपडपट्ट्यांमध्ये केवळ एक कंटेन्मेंट झोन आहे. तसेच, महापालिकेच्या २४ विभागांपैकी ११ विभागांमध्ये एकही इमारत सील करण्यात आलेली नाही.

धारावी आठव्यांदा शून्यावर

मुंबईमधील धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने गेल्या वर्षी ती हॉटस्पॉट बनली होती. १ एप्रिलला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. जुलै - ऑगस्टनंतर धारावीत रुग्णसंख्या घटत गेली. त्यानंतर दोन अंकी असलेली रोजची रुग्णसंख्या एकवर आली. अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली. २४ डिसेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा, २२ जानेवारी २०२१ ला दुसर्‍यांदा, २६ जानेवारीला तिसर्‍यांदा, २७ जानेवारीला चौथ्यांदा तर ३१ जानेवारीला पाचव्यांदा, २ फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.

मुंबई फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेदरम्यान धारावीतही रुग्णसंख्या वाढली होती. मात्र, धारावीत १४ जूनला एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज पुन्हा धारावीत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. धारावीत आतापर्यंत आठव्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. धारावीत राबवण्यात आलेल्या मॉडेलची चर्चा देशभरात करण्यात आली, तसेच हे मॉडेल अनेक ठिकाणी राबवण्यात आले आहे.

राबवण्यात आलेल्या उपाययोजना

पालिकेने ‘मिशन झिरो’, डॉक्टर आपल्या दारी, घरोघरी जाऊन तपासणी, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग हे ४ टी मॉडेल, कोरोनाच्या त्रिसुत्रीची अंमलबजावणी, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणे, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी, मी जबाबदार आदी उपायोजना राबवण्यात आल्या आहेत. शहरात घराबाहेर असताना नाक आणि तोंड झाकेल, असा मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. मास्क नसल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे कोरोना आटोक्यात आला आहे.

रुग्णसंख्या घटली

मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून पहिल्या लाटेदरम्यान ऑगस्ट, सप्टेंबर २०२० मध्ये २८०० च्या सुमारास रोज रुग्ण आढळून येत होते. तर, दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल मे २०२१ मध्ये ११ हजारांपर्यंत रुग्णसंख्या आढळून आली होती. दिवसाला ८० ते ९० रुग्णांचा मृत्यू होत होता. सध्या दिवसाला ५०० च्या सुमारास रुग्ण आढळून येत आहेत. तसेच, दिवसाला ८० ते ९० रुग्णांचा मृत्यू होत होता. सध्या दिवसाला १४ ते १९ रुग्णांचा मृत्यू होत आहे. मुंबईत मृत्युदर २.१२ टक्के इतका आहे.

हेही वाचा -कोरोना लसीकरण मोहिमेसाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळेंकडून एका महिन्याचे वेतन

ABOUT THE AUTHOR

...view details