मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. लसीकरणाला मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसादामुळे लसीचा तुटवडा जाणवत आहे. पालिका नोंदणी करून लसीकरणाला येण्याचे आवाहन करते. मात्र तिथे गेल्यावर आपल्याला पुढे लस मिळेल की नाही, याची भीती असल्याने नागरिक लसीचा साठा आल्याची माहिती मिळताच लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहे.
16 जानेवारीपासून लसीकरण -
मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्करना सुरुवातीला लस देण्यात आली. 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत रोज 30 ते 50 नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यातच कोविन ऍपवर नोंदणी नसली तरी त्यांची नोंदणी करून लस दिली जात होती.
गर्दी आणि पोलीस बंदोबस्त -
1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देताना कोविन ऍपवर नोंदणी केल्यावर त्याचा संदेश मोबाईलवर आल्यावरच लसीकरणाला या असे सांगण्यात आले आहे. तर 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करतानाही नोंदणी बंधनकारक करण्यात आले आहे. केवळ दुसरा डोस असलेल्या नागरिकांना वेगळी रांग लावण्यात आल्या असून त्यांना नोंदणीची आवशक्यता नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. मुंबईमधील नेस्को, सेव्हन हिल आदी बहुतेक लसीकरण केंद्रांवर अशी गर्दी पाहायला मिळत आहे. लसीकरणाला गर्दी केली जात असल्याने लसीकरण केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात लसीकरण केले जात आहे.
25 लाख नागरिकांना लस -
मुंबईत आतापर्यंत 25 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामधील 20 लाख नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. 5 लाख नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे लसीचा तुटवडा तसेच अनेकांना कामावर जाण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याने नागरिकांकडून लसीकरणाला गर्दी केली जात आहे.
बीकेसीत चेंगराचेंगरी -
मुंबईतील सर्वात मोठे जंबो कोविड सेंटर असलेल्या बिकेसी सेंटरमध्ये बुधवारी गर्दी झाली होती. या गर्दी दरम्यान चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमुळे अनेकांचे जीव धोक्यात आले होते. यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी कोविन ऍपवर नोंदणी केल्यावर मोबाईलवर म्यासेज आला असेल तरच लसीकरणाला यावे असे आवाहन पालिकेने केले आहे.