मुंबई - पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Election) पार्श्वभूमीवर प्रभाग रचना केली जात आहे. काही प्रभागात लोकसंख्या वाढल्याने राज्य सरकारने पालिकेच्या नगरसेवकांची संख्या ९ ने वाढवली आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील प्रभागांची संख्या वाढणार असल्याचे समोर आले आहे. यात पूर्व उपनगरात चार तर पश्चिम उपनगरात पाच प्रभाग वाढणार आहे. मुंबई शहरात मात्र प्रभागात वाढ होणार नाही, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकसंख्या वाढल्याने नगरसेवकांची संख्या वाढणार -
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार असल्याने पालिकेने निवडणुकीची तयारी करताना २७ प्रभागांच्या सुधारित सीमांकनाचा मसुदा राज्याच्या निवडणूक आयोगाला ऑक्टोबरमध्ये सादर केला होता. यानुसार लोकसंख्या वाढलेल्या भागात नगरसेवकांची संख्यावाढ होणार आहे. काल बुधवारी राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत २२७ नगरसेवक आहेत. त्यात ९ नगरसेवकांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २३६ होणार आहे. मुंबई शहर विभागात ५६, पूर्व उपनगरात ६९ तर पश्चिम उपनरात १०२ प्रभाग असे मिळून २२७ प्रभाग आहेत. यात ९ प्रभाग वाढल्याने प्रभागांची संख्या आता २३६ होणार आहेत.