मुंबई - नुकतेच मुंबई आणि नवी मुंबईला जलमार्गाने जोडणाऱ्या बहुचर्चित वॉटर टॅक्सीचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले आहे. मात्र, पहिलाच दिवशी वॉटर टॅक्सीची दोन्ही फेरी प्रवाशाविना धावली आहेत. त्यामुळे वॉटर टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीला 25 हजार रुपयांचा फटका बसला आहे.
२५ हजार रुपयांचा वॉटर टॅक्सीला चुना -
वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी समुद्र आणि नदीकाठच्या शहरांमध्ये जलवाहतूक विकसित करण्यावर केंद्रीय जल, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी भर देत आहेत. कोरोना पूर्वी रोरो बोट सुरू झाली आहेत. आता नुकतेच मुंबई आणि नवी मुंबईला जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सीची ही सुरुवात झाली आहेत. मात्र, महागडे तिकीट असल्याने मुंबईकरांनी या बहुचर्चित वॉटर टॅक्सीकडे पाठ फिरवली आहेत. सोमवारपासून ५६ आसनी वॉटर टॅक्सीचा दोन फेऱ्या चालवण्याचा निर्णय ‘गेटवे-एलिफंटा प्लिजर टूर अँड ट्रॅव्हल्स लिमिटेड’ कंपनीने घेतला आहे. त्यानुसार नवी मुंबईच्या बेलापूर बंदरावरून सोमवारी सकाळी भाऊच्या धक्क्याच्या दिशेने निघालेल्या वॉटर टॅक्सीची पहिलीच फेरी प्रवाशांविना सुरु झाली. याउलट भाऊच्या धक्क्याहून बेलापूर बंदराकडे सायंकाळी परतीच्या प्रवासातही वॉटर टॅक्सीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. परिणामी, पहिल्याच दिवशी प्रवाशांविना दोन फेऱ्या पूर्ण केल्याने वॉटर टॅक्सी चालक कंपनीस फक्त डिझेल खर्चापोटी तब्बल २५ हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.