मुंबई -मुंबईत जूनच्या अखेरीपासून जुलैच्या मध्यापर्यंत मुंबई आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात (Mumbai Water Supply Dam) चांगला पाऊस (Mumbai Rain News) पडला. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ८८ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने धरणातील पाणीसाठा वाढला नव्हता. मात्र आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने धरणामध्ये ९० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईची वर्षभराची तहान भागवायला आणखी दीड लाख दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे.
धरणांमध्ये ९० टक्के पाणीसाठा -मुंबईमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पाऊस पडतो. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. २९ जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. २९ जूनला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांमध्ये १ लाख ४७ हजार ६ दशलक्ष लिटर म्हणजेच १०.१६ टक्के पाणीसाठा होता. आज ( ६ ऑगस्ट) सकाळी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १३,०२,७७५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरणांमध्ये सध्या ९०.०१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सध्या धरणात ३३८ दिवसांचा पाणी साठा आहे. मुंबईला ११ महिने पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
१,४४,५८८ दशलक्ष लिटर पाण्याची गरज -मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सध्या धरणामध्ये १३,०२,७७५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा ९० टक्के पाणीसाठा आहे. पालिकेची सातही धरणे भरण्यासाठी १,४४,५८८ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. आतापर्यंत मोडक सागर, तानसा आणि तुळशी हि तीन धरणे भरून वाहू लागली आहे. सध्या ११ महिने पुरेल इतका पाणी आहे. ऑगस्ट महिना सुरु आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस पडेल. यामुळे धरणे भरतील. सप्टेंबरच्या अखेरीस पाण्याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर पाणी पुरवठ्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालिकेच्या जल विभागाकडून देण्यात आली आहे.