महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

mumbai vaccination : इतरांकडून कोरोनालागण होऊ नये म्हणून गर्भवती मातांना थेट प्रवेश - mumbai corona update

१९ मेपासून स्तनदा मातांच्या तर १५ जुलैपासून गर्भवती मातांचे लसीकरण केले जात आहे. मुंबईमधील लसीकरण केंद्रांवर गर्भवती महिलांना इतर नागरिकांकडून कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून लसीकरणासाठी थेट प्रवेश दिला जात आहे.

कोरोना व्हॅक्सिनेशन
कोरोना व्हॅक्सिनेशन

By

Published : Aug 5, 2021, 8:10 PM IST

मुंबई -कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे लसीकरणावर भर देण्यात आला आहे. विविध वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. १९ मेपासून स्तनदा मातांच्या तर १५ जुलैपासून गर्भवती मातांचे लसीकरण केले जात आहे. मुंबईमधील लसीकरण केंद्रांवर गर्भवती महिलांना इतर नागरिकांकडून कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून लसीकरणासाठी थेट प्रवेश दिला जात आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

लसीकरण मोहीम

मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. आरोग्य, फ्रंटलाइन कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वयोगटातील, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. केंद्र सरकारने १९ मेला घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेने २५ मेपासून स्तनदा मातांचे लसीकरण सुरू करण्यात आले. याचवेळी महापालिकेने गर्भवती महिलांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून गर्भवती मातांचे लसीकरण केले जात आहे. गर्भवती मातांना लसीकरणाला आलेल्या इतर नागरिकांकडून कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती जास्त असल्याने त्यांना रांगेत उभे न करता थेट प्रवेश देऊन लसीकरण केले जाते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

लसीकरण केंद्रांवर लाभार्थ्यांना 'या' सोयी

मुंबईमधील सर्वच लसीकरण केंद्रांवर नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लसीसाठी आलेल्या लाभार्थ्यांना आणि लसीकरण झाल्यावर लाभार्थ्यांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवले जाते. त्याठिकाणी लाभार्थ्यांना बसण्यासाठी खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांचे मनोरंजन व्हावे, यासाठी स्क्रीन लावण्यात आले आहे. काही खासगी लसीकरण केंद्रांवर सौम्य आवाजात संगीत लावले जाते. मुंबईमधील काही अपवाद वगळता बहुतेक सर्वच लसीकरण केंद्र तळमजल्यावर असल्याने गरोदर महिला, दिव्यांग तसेच वयोवृद्ध नागरिकांना लसीकरण करताना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

स्त्री रोग तज्ज्ञाचे प्रमाणपत्र आवश्यक

कोविड प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असेल अशा गरोदर स्त्रियांना त्यांच्यावर उपचार करीत असलेल्या स्त्री रोग तज्ज्ञाने त्यांच्या लेटरहेडवर लस देण्याबाबत लेखी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. असे प्रमाणपत्र गरोदर स्त्रियांनी स्वतः स्त्री रोग तज्ज्ञाकडून प्राप्त केल्यानंतर कोविड लस घेण्याबाबत स्वतःचे संमतीपत्र देखील द्यावे लागते. स्त्री रोग तज्ज्ञाचे प्रमाणपत्र आणि स्वतःचे संमतीपत्र लसीकरण केंद्रांवर दिल्यावर गरोदर मातांना लस दिली जाते.

४,२९० स्तनदा माता, ३६७ गर्भवती महिलांना लस

मुंबईत १६ जानेवारीपासून ३ ऑगस्टपर्यंत ७३ लाख ३६ हजार १७१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात ५५ लाख २७ हजार ०९६ लाभार्थ्यांना पहिला तर १८ लाख ०९ हजार ०७५ लाभार्थ्यांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत ४ हजार २९० स्तनदा मातांना तसेच ३६७ गर्भवती महिलांना लसीचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details