मुंबई -विद्यार्थ्यांना परीक्षा आणि त्या काळात येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने मुंबई विद्यापीठाने बी. कॉमच्या ५५ हजार विद्यार्थ्यांना मोबाईलवर हॉलतिकिट उपलब्ध करून दिले आहे. एका अ्ॅपवर हे हॉलतिकिट उपलब्ध केले असल्याची माहिती आज विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली.
मुंबई विद्यापीठाच्या बी. कॉम सत्र-६ ची परीक्षा ३ एप्रिलपासून सुरू होत आहेत. या परीक्षेची ५७ हजारांपेक्षा जास्त प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये देण्यात आलेली आहेत. त्यासोबत पहिल्यांदाच विद्यापीठाने संबधित परीक्षेच्या २० दिवस आधी प्रवेशपत्रे एका मोबाईल अॅपरही उपलब्ध करून दिली असून त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. महाविद्यालयाच्या लॉगिनमध्येही प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
हॉलतिकिटवरील तपशील दुरुस्तीसाठी 20 मार्चपूर्वी करा अर्ज
व्यक्तिगत तपशील, मराठीतील नाव, छायाचित्र व स्वाक्षरी या सर्व माहितीचा उपयोग विद्यापीठ गुणपत्रिका, पदवी, प्रमाणपत्रे व विविध प्रमाणपत्रे यावर करीत असल्याने या तपशिलात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. दरम्यान, जर विद्यार्थ्यास त्याच्या तपशिलात दुरुस्ती करावयाची असेल तर त्यांनी तशी विनंती त्यांच्या सबंधित महाविद्यालयाकडे करायची आहे. महाविद्यालयांनी या दुरुस्त्या विद्यापीठाकडे पाठविल्यास, त्याचा तपशील दुरुस्त केला जाईल. या दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांनी २० मार्च पूर्वी महाविद्यालयाकडे विनंती करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
बी.कॉम सत्र-५ ला विद्यार्थ्यांनी ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली, तेच परीक्षा केंद्र बीकॉम सत्र-६ च्या परीक्षेत निश्चित केलेले आहे. ही परीक्षा केंद्रे व त्यांचा पत्ता सत्र-६ च्या प्रवेशपत्रावर टाकण्यात आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यास ऐनवेळी परीक्षा केंद शोधण्यास वेळ लागणार नाही, असा दावा विद्यापीठाने केला आहे.