मुंबई -नेहमीच मुंबई विद्यापीठ काहीना काही कारणामुळे चर्चेत राहते. आता शनिवारी जाहीर झालेल्या पेट परीक्षेच्या निकालामध्येही मुंबई विद्यापीठाचा गोंधळ दिसून आला आहे. निकालानंतर अवघ्या दोन दिवसांत नव्याने निकाल जाहीर करत पीएच. डी.साठी अपात्र ठरवलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पात्र ठरवले आहे. काही विद्यार्थ्यांचे गुण कमी करण्याचा अजब प्रकार विद्यापीठाकडून करण्यात आला आहे. नव्याने आलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे मुंबई विद्यापीठाचा कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना केले पात्र -
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी २५, २६ आणि २७ मार्चदरम्यान ऑनलाइन पेट परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल 17 एप्रिलला जाहीर करण्यात आला. ‘एकलव्य’ अॅपवरून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्याच अॅप किंवा लिंकवर विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांनी निकालाचे प्रमाणपत्र मिळवले. मात्र, विधी अभ्यासक्रमामध्ये पीएचडी करणार्या पेट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना 19 एप्रिलला विद्यापीठाने जोरदार झटका दिला. या विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडीमध्ये नव्याने निकालाची प्रत प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये पहिल्या निकालामध्ये अपात्र ठरवलेल्या विद्यार्थ्यांना दुसर्या निकालामध्ये पात्र ठरवले होते. काही विद्यार्थ्यांना पहिल्या निकालाच्या तुलनेत दुसर्या निकालामध्ये दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले. काही विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले आहेत. पेट परीक्षेच्या दरम्यान सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड आल्याने अनेक विद्यार्थ्यांना लॉगिनमधून बाहेर येऊन पुन्हा परीक्षा देण्यास विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे परीक्षेदरम्यानचा हा गोंधळ सुधारण्याऐवजी विद्यापीठाकडून निकालामध्येही गोंधळ घातल्याने विद्यर्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्या -
मुंबई विद्यापीठाचे युवासेना सिनेट सदस्य डॉ. धनराज कोहचाडे यांनी सांगितले, की पेटच्या परीक्षेत विद्यापीठाकडून घातलेला घोळ हा अत्यंत वाईट प्रकार आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात यावे किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. तरच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. मुंबई विद्यापीठाने गोंधळ घालणे बंद करावे. विद्यापीठाच्या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.