महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठ राज्यात अव्वल - मुंबई विद्यापीठ

करेली सायमंड (क्यूएस) यांनी देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सर्वोत्तम आहे.

मुंबई विद्यापीठ

By

Published : Jun 20, 2019, 6:50 AM IST

मुंबई -देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहोर उमटली आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार राज्यातील पारंपारिक विद्यापीठाच्या यादीत मुंबई विद्यापीठ प्रथम क्रमांकावर पोहचले आहे. तर देशातील पारंपारिक विद्यापीठात ४ थ्या क्रमांकावर आहे. क्वाकरेली सायमंड (क्यूएस) यांनी देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सर्वोत्तम आहे.

मुंबई विद्यापीठाने गेल्या ५ वर्षात भरीव कामगिरी केली आहे. विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यापीठाची कामगिरी उत्कृष्ट आहे. मागील ५ वर्षात विद्यापीठात १०४ टक्क्यांनी पदवी आणि ११२ टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तर दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १४७ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. एवढच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्समध्ये १५६ टक्क्यांनी संशोधन पेपर्स मध्ये वाढ झाली आहे, अशी माहिती क्यूएसच्या अहवालात दिली आहे.

विद्यापीठाच्या १२ विभागांना अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाशी संलग्नित असलेले ८० पेक्षा जास्त प्राध्यापक हे विविध व्यावसायिक कार्यकारणीवर कार्यरत आहेत. तर मागील ५ वर्षात १८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने येथील प्राध्यापकांना गौरवण्यात आल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. देशाची ज्ञानविषयक गौरवशाली परंपरा आणि वाढता सामाजिक-आर्थिक प्रभाव पाहता मुंबई विद्यापीठाने ज्ञानदानाच्या या पवित्र कार्यात आपला मोलाचा ठसा उमटवला आहे.

विद्यापीठाने समाजाचे बौध्दिक आणि नैतिक शक्तिस्थान म्हणून गेल्या १६२ वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. सामाजिक मूल्य आणि संधींची सतत वाढणारी जबाबदारी उत्साहाने वागवत देशाला विशेषतः महाराष्ट्र आणि मुंबई शहराला उत्तम गुणवत्ता दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या ७९१ सलंग्नित महाविद्यालयातून जवळपास ७ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पारंपारिक शिक्षणाबरोबर व्यवसायाभिमुख शिक्षणाची कास धरणाऱ्या मुंबई विद्यापीठाने व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम, नाविण्यपूर्ण शिक्षणक्रम, आदर्श महाविद्यालये सुरू केली आहेत. तर विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाबरोबरच ५ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, कल्याण, मुंबई, आणि मुंबई उपनगर या ठिकाणी मुंबई विद्यापीठामार्फत विविध शिक्षणक्रम चालविले जातात.

विद्यापीठातील सर्व घटकांनी संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष आणि साश्वत प्रयत्नांची ही फळनिश्चिती आहे. या निकालाचे समाधान असून भविष्यात रँकिंगमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील, प्रामुख्याने विद्यापीठ कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, केमिकल टेक्नोलॉजीच्या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्र करत आहे. विकासाची कास धरणारे मुंबई विद्यापीठ हे समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणार आहे, असे मत कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details