मुंबई : गुरुवारी मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा अतिवृष्टीचा इशारा ( Heavy Rain Warning ) देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या देण्यात आलेल्या इशाऱ्यामुळे मुंबई विद्यापीठाने आपल्या आजच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, मुंबईसह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. 11 ते 14 जुलैपर्यंत तीनही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात ( Orange alert was given to three districts ) आला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे.
हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस मुसळधार : त्यात आजदेखील मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे लोकल सेवा आणि रस्ते वाहतूक प्रभावित झाली आहे. आजही पावसाचा परिणाम लोकल सेवा आणि रस्ते वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येऊ शकतात. म्हणून मुंबई विद्यापीठाने आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत.
मुंबई विद्यापीठाची परीक्षा रद्द : मुंबई विद्यापीठात मुंबई, मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून विद्यार्थी येत असतात. या सर्व जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या होणाऱ्या सर्व परीक्षा मुंबई विद्यापीने रद्द करण्याचा निर्णय घेतला. आज अभियांत्रिकी आणि इतर विभागाच्या परीक्षा होणार होत्या. मात्र, आता या विभागाच्या परीक्षांची पुढील परीक्षांची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
आणखी 3 ते 4 दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार : हवामान विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून, अनेक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसादरम्यान मरिन ड्राईव्हवरही उधाणाची भरती-ओहोटी दिसून आली. आयएमडीने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुण्यातील घाट भागात आणि सातारा, नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यांत पुढील आणखी तीन ते चार दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.