मुंबई - एका अनुभवी महिलेने स्वत:च्या स्वार्थासाठी तरूणाचा वापर केला असे गंभीर मत मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायालयाने एका 20 वर्षीय तरूणाने 42 वर्षीय घटस्फोटीत महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपासंदर्भातील खटल्याची सुनावणी करताना हे मत नोंदवले आहे. तक्रारदार महिलेच्या आरोपांवर संशय वक्त करत मुंबई सत्र न्यायालयाकडून तरूणाला अटकपूर्व जामीन मंजूर करत दिलास देण्यात आला आहे.
प्रकरण काय आहे? -
मुलुंडमधील रहिवासी असलेल्या या मुलाचे साकीनाका परिसरात राहणाऱ्या एका 42 वर्षीय मुस्लीम महिलेसोबत प्रेमसंबंध होते. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार साल 2004मध्ये या महिलेचा पहिल्या पतीसोबत तलाक झाला आहे. त्यानंतर सप्टेंबर 2018पासून तिचे या मुलासोबत संबंध होते. मात्र, या मुलाने लग्नाचे वचन देत आपला वारंवार बलात्कार केला असून आपल्याकडून 50 ग्राम सोने आणि लोनवर एक दुचाकीही घेतल्याचा आरोप केला आहे. या महिलेचा दावा आहे, "या मुलाने तिच्या घरी एक काझी बोलावून तिच्याशी निकाह केला आहे. तसेच आपले खोट आधारकार्ड दाखवून आपण 26 वर्षाचे असल्याचे सांगितले होते. लग्नाच्या काही दिवसांतच अचानक हे लग्न माझ्या घरच्यांना मान्य होणार नाही, असे सांगत आपल्याला पुन्हा आपल्या पहिल्या नवऱ्याकडे सोडून गेला. मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाचे निरीक्षणमुळात 16 वर्ष संसार केलेल्या 42 वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष देऊन बलात्कार केला ही गोष्टच सहज पटण्यासारखी नाही. उलट याप्रकरणात एका अनुभवी महिलेने स्वत:च्या स्वार्थासाठी एका तरुणाचा वापर केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. हा तरुण जैन असल्याने तो लग्न करण्यासाठी घरी पंडित ऐवजी 'काझी' का बोलावेल?, असा प्रश्न कोर्टाने केला.
मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवताना आरोपीच्या वयाची कोणतीही खातरजमा केली नाही. मुळात त्याचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला तपासायला हवा होता. मात्र, पोलीस केवळ तक्रारदार महिलेच्या जबानीवर विसंबून राहिले असे गंभीर निरीक्षण कोर्टाने पोलिसांच्या या केसमधील कारभारासंदर्भात नोंदविली.