मुंबई -सिटी सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ (anandrao adsul) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका आज (दि. 15) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एस. एच. सातभाई यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सक्तवसुली संचालनालया(ED)ने आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वीही आनंदराव अडसूळ यांनी ईडीची कारवाई टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने (High Court) त्यांना कोणताही दिलासा न देता मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याचे सांगितले होते. त्यानुसार अडसूळ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर आज कोर्टाने निर्णय देत तात्पुरता जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. मात्र, कायमस्वरुपी अटकपूर्व जामिनाचा अर्जवर ईडीने उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
प्रकरण काय आहे..?
आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. सिटी को-ऑप. बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी केली होती. या तक्रारीनंतर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) अडसूळ (Adsul) यांच्या रहात्या घरी आणि कार्यालय येथे छापा टाकला होता. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या दोन वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली. पण, अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.