मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांनी सोमवारी (दि. 3 जानेवारी) मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नसून जामीन अर्जावर 11 जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे.
100 कोटी कथीत वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल बारा तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 65 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7 हजार पानांचे पुरवणी आरोपपत्रही दाखल केले आहे. यामध्ये अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या मेव्हण्यालाही सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला सक्त वसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने फरार घोषित केले आहे. या प्रकरणात एकूण तिघांना ईडीने फरार घोषित केले आहे. वारंवार समन्स देवूनही अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही. मात्र, याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती. पण, याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.