मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीची ( RajyaSabha Election 2022 ) रणधुमाळी महाराष्ट्रात सध्या सुरु आहे. त्यातच तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळेल का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज ( 8 मे ) या अर्जावर निकाल येईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, तब्बल तीन ते चार तासाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने ( Mumbai Session Court ) निकाल राखून ठेवला आहे. उद्या ( 9 मे ) सकाळी 11 वाजता निकालावर सुनावणी होणार आहे.
ईडीने घेतला आक्षेप - राज्यसभेच्या निवडणुकीच्या एक दिवसआधीच हा निकाल येणार असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची धाकधुक वाढली आहे. या दोन्ही नेत्यांना मतदान करता यावं म्हणून राष्ट्रवादीने न्यायालयात धाव घेतली होती. तर ईडीने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना मतदान करता येणार की नाही?, असा सवाल करण्यात येत होता. पण, न्यायालयाकडून निर्णय राखून ठेवल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दोन मतं अत्यंत महत्वाची - सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. भाजपाने सातवा उमेदवार दिल्याने ही लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. आघाडी आणि भाजपाची मदार अपक्ष मतांवर असल्याने या निवडणुकीत एका-एका मताचं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे कोणतंही मत वाया जाऊ नये म्हणून आघाडीने खबरदारी घेतली आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. त्यांची दोन मते अत्यंत महत्त्वाची असल्याने राष्ट्रवादीने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याचिका दाखल करून घेत 8 जून रोजी त्यावर फैसला देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज मुंबई सत्र न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अनेक दाखलेही न्यायालयात देण्यात आले. तब्बल तीन ते चार तास हा युक्तिवाद चालला. दोन्हीकडचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर यावर उद्या निकाल देणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.