मुंबई - कोरोनावरील लस नव्या वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच मुंबई महानगर पालिकेने लसीकरण मोहीमेचा आराखडा तयार केला. त्यानुसार 8 मोठी लसीकरण केंद्र तयार करण्यात येत आहेत. दरम्यान लसीकरण मोहिमेला वेग आल्यास ही केंद्रे कमी पडणार असल्याने पालिकेने शाळा आणि जिमखान्याचे रूपांतर लसीकरण केंद्रात करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या टप्प्यात हा केंद्राचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
पहिल्या टप्प्यात कोरोना योध्याना लस-
कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होणार असून मुंबईची लोकसंख्या प्रचंड आहे. त्यामुळे लसीकरणासाठी पालिकेने टप्पे आणि प्राधान्यक्रम ठरवला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे अर्थात सरकारी, पालिका कर्मचारी, खासगी डॉक्टर, नर्स-वॉर्डबॉय यांना लस देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स अर्थात पोलीस, सफाई कर्मचारी आदींना लस देण्यात येणार आहे. तिसरा टप्पा हा 50 वर्षांवरील नागरिकांचा आणि सहव्याधी असलेल्याना लस देण्यात येणार आहे. पुढे आणखी टप्पे ठरवत सर्व नागरिकांपर्यंत लस पोहचवली जाणार आहे.
सद्या 8 केंद्रात लसीकरण-
लसीकरण मोहीमेच्या पूर्वतयारीला पालिकेने वेग दिला आहे. त्यानुसार 8 केंद्र तयार केली जात असून या केंद्रात लस दिली जाणार आहे. पालिकेच्या नायर, केईएम, सायन आणि कूपर या मुख्य रुग्णालयासह ट्रॉमा केअर, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, राजावाडी या रुग्णालयात लसीकरण केंद्र असणार आहेत. या केंद्रात सुमारे दीड लाख कोरोना योध्याना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहेत.