मुंबई - जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron Patients) आढळून येत आहेत. राज्यात डोंबिवली, मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे आतापर्यंत ओमायक्रॉनचे १८ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतही ओमायक्रॉनचे ५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३ रुग्णांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज (13 डिसेंबर) मुंबईत ओमायक्रॉनचा (Omicron Mumbai) एकही रुग्ण आढळून आला नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
- आतापर्यंत ३ ओमायक्रॉन रुग्णांना डिस्चार्ज -
डिसेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान अति जोखमीच्या देशातून ६८२१ आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबई विमानतळावर आले. त्यापैकी ८ पुरुष व २ स्त्रिया अशा एकूण १० प्रवासी कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. तर १ नोव्हेंबरपासून २५ पुरुष आणि १० स्त्रिया असे एकूण ३५ प्रवासी कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोविड पॉजिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले ४ पुरूष आणि ८ स्त्रिया असे एकूण १२ सहवासित पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्वांचे जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या असता ४ पुरुष व १ स्त्री असे एकूण ५ प्रवासी ओमायक्रॉन पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ३ ओमायक्रॉन रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- आरोग्य विभागाला माहिती द्या -
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरूप वर्तनाचा अंगीकार करावा. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिन्याभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगर पालीकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.