मुंबई - मुंबईमध्ये डिसेंबरपासून पुन्हा कोरोना विषाणूचा प्रसार वाढला असून तीन दिवसात रोज २० हजारांवर रुग्ण आढळून येत आहेत. मुंबई महापालिकेच्या २४ विभागांपैकी अंधेरी पश्चिम, बांद्रा, अंधेरी पूर्व, कांदिवली, मालाड, बोरिवली, माटुंगा, खार या विभागात गेल्या आठवडाभरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर सँडहर्स्ट रोड, मरिन लाईन्स आणि चेंबूर या विभागात सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये ज्या विभागात रुग्णसंख्या वाढत आहे त्या विभागावर पालिकेने आपले लक्ष केंद्रित केले आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Mumbai Corona : मुंबईत आठवडाभरात 'या' विभागात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद
मुंबईमध्ये डिसेंबरपासून पुन्हा कोरोना विषाणूचा प्रसार वाढला असून तीन दिवसात रोज २० हजारांवर रुग्ण आढळून येत आहेत. मुंबई महापालिकेच्या २४ विभागांपैकी अंधेरी पश्चिम, बांद्रा, अंधेरी पूर्व, कांदिवली, मालाड, बोरिवली, माटुंगा, खार या विभागात गेल्या आठवडाभरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर सँडहर्स्ट रोड, मरिन लाईन्स आणि चेंबूर या विभागात सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाचा प्रसार -
मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या दोन वर्षात मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आली आहे. पहिल्या लाटेत दिवसाला २८००, मागील वर्षी एप्रिल महिन्यात दुसऱ्या लाटेत ११ हजार ५०० रुग्ण आढळून आले. आता तिसऱ्या लाटेत दिवसाला २० हजारावर रुग्ण आढळून येत आहेत. रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना पालिकेच्या २४ विभागापैकी काही विभागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे.
..या विभागात सर्वाधिक रुग्णांची नोंद -
१ जानेवारी ते ७ जानेवारीदरम्यान मुंबईमध्ये ८४ हजार ३२० रुग्णांची नोंद झाली आहे. या आठवडाभराच्या कालावधीत सर्वाधिक के वेस्ट अंधेरी पश्चिम येथे ९७८८, एच वेस्ट बांद्रा येथे ७२८९, के इस्ट अंधेरी पूर्व येथे ६६०७, आर साऊथ कांदिवली येथे ४५९४, पी नॉर्थ मालाड येथे ४४६८, आर सेंट्रल बोरिवली येथे ४३२३, एफ नॉर्थ माटुंगा येथे ४१६६, एच ईस्ट खार येथे ४०१८ रुग्णांची नोंद झाली.
हे ही वाचा -Sulli Deal App : सुल्ली डिल अॅपच्या मास्टमाईंडला इंदूरमधून अटक
..या विभागात कमी रुग्णांची नोंद -
पालिकेच्या बी विभाग सँडहर्स्ट रोड येथे २९०, सी विभाग मारिन लाईन्स येथे ७०४ तर एम ईस्ट विभाग चेंबूर येथे १७२२ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महापालिकेच्या २४ विभागाच्या तुलनेत या तीन विभागात गेल्या आठवडाभरात सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली.
त्या विभागावर लक्ष -
मुंबईमध्ये डिसेंबरपासून पुन्हा कोरोनाचा प्रसार सुरु झाला आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी ९० टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. ५ टक्के रुग्णांना रुग्णालयात तर १ ते २ टक्के रुग्णांना आयसीयूची गरज भासत आहे. ज्या विभागात कोरोना पसरत आहे त्या विभागावर पालिकेने लक्ष केंद्रित केले असून कोरोना नियमांची व कंटेंटमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालिकेच्या वॉर्ड कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
८ लाख ९५ हजार ९८ रुग्णांची नोंद -
मुंबईत ८ जानेवारीला २० हजार ३१८ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ). तर ५ मृत्यूची नोंद झाली आहे. ६ हजार ३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ८ लाख ९५ हजार ९८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ७० हजार ५६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ३९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ६ हजार ३७ वर पोहोचली ( Active Corona Patients in Mumbai ) आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४७ दिवस इतका आहे. मुंबईमधील १२० इमारती आणि ९ झोपडपट्ट्या सील करण्यात आली आहे. १ जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.४७ टक्के इतका आहे.
७९ टक्के बेड रिक्त -
मुंबईत ८ जानेवारीला आढळून आलेल्या २० हजार ३१८ रुग्णांपैकी १६ हजार ६६१ म्हणजेच ८२ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. त्यापैकी १ हजार २५७ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १०८ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३३ हजार ८०३ बेड्स असून त्यामधील ७ हजार २३४ बेड्सवर म्हणजेच २१ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ७९ टक्के बेड रिक्त आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १ हजार ३७७, २९ डिसेंबरला २ हजार ५१०, ३० डिसेंबर ३ हजार ६७१, ३१ डिसेंबरला ५ हजार ६३१, १ जानेवारीला ६ हजार ३४७, २ जानेवारीला ८ हजार ६३, ३ जानेवारीला ८ हजार ८२, ४ जानेवारीला १० हजार ८६०, ५ जानेवारीला १५ हजार १६६, ६ जानेवारीला २० हजार १८१, ७ जानेवारीला २० हजार ९७१, ८ जानेवारीला २० हजार ३१८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.