मुंबई -मान्सून अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. मुंबई महानगपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी कामांना वेग आला आहे. मुंबई मनपाने दावा केला आहे की, यंदा मुंबईतील नालेसफाईची कामे 80 ते 90 टक्के कामे पूर्ण झाली आहे. ज्या मिठी नदीमुळे नदी किनारी जी घरे आहेत, त्यांना पावसाळ्यात दरवर्षी पाणी तुंबल्यामळे फटका बसतो. मात्र यंदा मिठी नदीचीदेखील सफाई केली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मुंबई मनपाने मिठी नदीतून गाळ काढला असल्याचे सांगितले आहे. तसेच मिठी नदीची तब्बल 60 टक्के सफाई पूर्ण झाल्याचा दावा देखील केला आहे.
मिठी नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना त्रास
दरवर्षी मुंबईत पाणी तुंबल्यानंतर मिठी नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. नदी किनारी राहणाऱ्या जवळपास 1000 ते 1500 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येते. मुख्यत्वे कुर्ल्याच्या नेहरू नगर, बैल बाजार, कुर्ला पश्चिम येथील विभागाला या तुंबलेल्या पाण्याचा फटका बसतो. पालिकेने नालेसफाई आणि नदीची सफाई केल्याचा दावा जरी केला असला तरी पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही हीच अपेक्षा आहे. पालिकेकडून जेव्हा नाल्यांची सफाई होते तेव्हा ही सफाई पावसाळ्यापूर्वी 75 टक्के, पावसाळ्यादरम्यान 15 टक्के आणि पावसाळ्यानंतर 10 टक्के केली जाते.