मुंबई - पावसाळ्यात नेहमीच मुंबईची तुंबई होते. पाणी तुंबल्यामुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. वेळप्रसंगी मुंबई ठप्प होते. पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यावर्षी मुंबईत तब्बल 700 पंप लावण्यात आले आहे. या पंपाच्या साहाय्याने साचलेले पाणी गटार, नाल्यामार्गे समुद्रात सोडले जाणार आहे.
दरवर्षी, मुंबईत 2 हजार 500 मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद होते. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भाग असल्याने पावसाळ्यात या विभागात पाणी साचते. पाणी साचल्याने वाहतूक बंद पडते, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा बंद पडते. रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद पडल्याने शहर ठप्प होते. नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने नुकसानही मोठ्या प्रमाणात होते.
महापालिका दरवर्षी 250 ते 300 पंप साचलेले पाणी उपसण्यासाठी वापरत होती. 26 जुलै 2005 च्या अनुभवानंतर पालिकेने हाजी अली, लव्हग्रोव्ह, क्लिव्ह लँड बंदर, इर्ला, ब्रिटानिया व गझधरबंद आदी पपिंग स्टेशनची उभारणी केली आहे. या सर्व पपिंग स्टेशनमधून सेकंदाला 6 हजार लिटर पाणी समुद्रात सोडले जाते. या प्रत्येक पंपिंग स्टेशनच्या उभारणीसाठी पालिकेने 100 कोटीहून अधिक रक्कम खर्च केली आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी सखल भाग असल्याने पाणी साचतच असते. मुंबईत हिंदमाता, किंग सर्कल, सायन, सायन स्टेशन, अंधेरी मिलन सबवे आदी विभागात थोडासा पाऊस पडला तरी पाणी साचते. तसेच मुंबईत आता अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. या कामासाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. यामुळेही पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे.