मुंबई -अवघ्या दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपलेला आहे. पावसाळ्यात उपनगरी रेल्वे सेवेत कोणताही अडथळा यायला नको म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेने कंबर कसलेली आहे. रेल्वे मार्गावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गावर 260 पंप बसविण्यात येणार ( Mumbai Railway Install Pumps ) आहेत.
या ठिकाणी पावसाचे साचते पाणी -पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने मुंबई उपनगरातील लोकल सेवेवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे प्रवाशांना सुद्धा मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर्षी रेल्वे रुळावरून साचलेले पाणी काढण्यासाठी मध्य रेल्वे 118 आणि पश्चिम रेल्वे 142 असे एकूण 260 हाय पॉवर पंप मशीन बसविणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मज्जिद सँनडहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी ते करी रोड, परळ, दादर ते शीव, कुर्ला, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड व ठाणे, तसेच हार्बर मार्गावरील टिळकनगर, चुनाभट्टी, गुरू तेग बहादूर नगर याठिकाणी पाणी साचून रेल्वे सेवा विस्कळीत होते. तर, पश्चिम रेल्वे मार्गावरील ग्रांट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहीम यार्ड, वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी आणि वसई-विरार या भागात पाणी साचण्याच्या घटना होतात. त्यामुळे या भागातून पाण्याचा उपसा करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून हाय पॉवर पंप मशीन बसविण्यात येत आहे.