मुंबई - दरवर्षी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला पावसाळ्यात अतिवृष्टीच्या सामना करावा लागला होता. अनेक रेल्वे गाड्या पुरात अडकलेल्याने रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी बोटी नसल्याने इतर यंत्रणांवर अवलंबून राहावे लागले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेने बोटी घेतल्या आहे. यंदा प्रवाशांचा सुटकेसाठी रेल्वेचे 'पूर बचाव पथक' सज्ज झाले आहे. या पथकात ५ बचाव बोटींचा समावेश करण्यात आला ( Mumbai Railway flood Rescue Squad ) आहे.
१९ पेक्षा अधिक संवेदनशील ठिकाणी पथक असणार तैनात -वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, दरवर्षी पावसाळ्यात अनेकदा रेल्वे रुळावर पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. तेव्हा लोकल ट्रेन आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आम्हाला इतर यंत्रणांवर अवलंबून राहावे लागले होते. पण, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही स्वतंत्र बोटी खरेदी करून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी 'पूर बचाव पथक' तयार केलं आहे. या पथकातील आरपीएफ जवानांना विशेष प्रकारची ट्रेनिंग दिली आहे. यंदाचा पावसाळ्यात मध्य रेल्वेवरील मुख्य आणि हार्बर रेल्वेवरील १९ पेक्षा अधिक संवेदनशील ठिकाणी 'पूर बचाव पथक' तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय लोकलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून १०० हुन अधिक लहान शिड्या खरेदी करण्यात येणार आहेत.