मुंबई -मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला धमकीचा मेसेज देण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. 26 / 11 सारखा हल्ला करणार, असा धमकीचा मेसेज देण्यात आला आहे. मुंबई पोलीस ट्रॅफिक कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाकिस्तानमधून हे धमकीचे मेसेजेस आले असल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला करण्यासाठी भारतात असलेल्या ६ जणांची मदत घेणार असल्याचं धमकी देणाऱ्यांनी मेसेजमधून सांगितलं आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशतवादी हल्लाचे सावट परसले Mumbai Police traffic control Saturday received 26 11 attack threat आहे.
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल -मुंबई पोलीस ट्रॅफिक कंट्रोलला पाक-आधारित फोन नंबरवरून 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा मेसेज मिळाला होता. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम 506(2) अंतर्गत वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी विरार येथून एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु केली आहे. संबंधित व्यक्ती उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांचे आवाहन - 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांना आला होता. धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. यासंदर्भात तपास सुरु केला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
ते म्हणाले की, मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. मुंबई गुन्हे शाखा याबाबात सखोल कारवाई करत आहे. तसेच, यासंदर्भात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री मुंबईच्या ट्रॅफिक पोलीस कंट्रोलला एक मेसेज आला होता, त्यात दहशत पसरवण्याबाबत बोलत होते, ते धमक्या देत होते. धमकी देणाऱ्यांचे काही साथीदार भारतातही सक्रिय असल्याचा उल्लेख मजकूरात आहे, अशी माहितीही विवेक फणसळकर यांनी दिली.