मुंबई -भरधाव किंवा बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात ( Road Accident In Mumbai ) होत आहेत. चालकांना आळा घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी मोठी ( Mumbai Police Action Against Rash Driving ) कारवाई सुरु केली आहे. यंदा राज्यभरात वेग मर्यादा ओलांडणाऱ्या ३ लाख ८२ हजार चारचाकींवर कारवाई करत ७६ कोटी ४० लाख २४ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
अशी आहे कारवाईची आकडेवारी -वेग मर्यादा ओलांडल्याने महामार्गांवर अधिक अपघात होत आहेत. वेग मर्यादेकडे दुर्लक्ष करत वाहन हाकणाऱ्या चालकांनाही वाहतूक विभागाने कारवाई करत दणका दिला आहे. वाहतूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात यावर्षी वेग मर्यादेचे उल्लंघन केलेल्या ३ लाख ८२ हजार १३ हलक्या चारचाकी वाहनांसह १ हजार ८७१ दुचाकी व तीनचाकी, ७ हजार ९८६ इतर वाहने आणि २४ ट्रॅक्टर्सवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईतून दुचाकी व तीनचाकीस्वारांवर १८ लाख ६६ हजार रुपये, हलक्या चारचाकी वाहनांवर ७६ कोटी ४० लाख २४ हजार रुपये, इतर वाहनांवर २ कोटी ६७ लाख ८८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. एक्स्प्रेस मार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये प्रमुख कारण अतिवेगाने वाहने चालवणे हे आहे. त्यामुळे महामार्ग वाहतूक पोलिसांनी अशा वाहन चालकांविरोधात मोहीम सुरू केली आहे.