मुंबई - दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून लवकरच न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे. दिशा एकेकाळीबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर म्हणून काम पाहत होती. दिशा सालीयन हिने 8 जून रोजी तिने राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. यानंतर दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते.
हत्या किंवा अत्याचाराचा कुठलाही पुरावा नाही-
दिशा सालियान ही मानसिक तणावाखाली होती. तिला मारहाण करण्यात आली होती. तिची हत्या झाली व हत्येपूर्वी तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोपही वेगवेगळ्या माध्यमातून केला जात होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून गेल्या काही महिन्यांपासून तपास सुरू होता. मात्र दिशा सालियान हिच्या मृत्यूप्रकरणी कुठलाही आक्षेपार्ह पुरावा पोलिसांना आढळलेला नाही.
दिशा सालियान हिची हत्या झाली का? मृत्यू होण्यापूर्वी तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले होते का? या संबंधी कुठलाही पुरावा मुंबई पोलिसांना मिळाला नसल्यामुळे मुंबई पोलिसांकडून लवकरच न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला जाणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
मुंबई पोलिसांचा तापास योग्य - सालियान कुटुंबीय
या अगोदर दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मालवणी पोलीस ठाण्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात तक्रार दाखल केली होती. वेगवेगळ्या समाज माध्यमांवर काही बॉलीवूड व राजकारणी व्यक्तींकडून दिशाच्या आत्महत्येसंदर्भात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात होत्या. याचा कुटुंबाला नाहक मानसिक त्रास होत आहे. अशी तक्रार दिशाच्या वडीलांनी दिली होती. या बरोबरच मुंबई पोलिसांनी आतापर्यंत जो काही तपास केला आहे. त्या तपासाला घेऊन आम्ही समाधानी असून आमचा कुणावरही संशय किंवा आरोप नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले होते.
हेही वाचा-ड्रग्जप्रकरणी अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात हजर