मुंबई - मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी सांगितले की, १० सप्टेंबरच्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान साकीनाका येथील एका फॅक्टरीमधील वॉचमनने कंट्रोल रुमला फोन करून कळवले की, येथे एका महिलेला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवले. संबंधित अधिकारी दहा मिनिटाच्या आत तिथे पोहोचले. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत एक महिला अत्यंत गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. त्यावेळी पोलिसांनी विलंब न लावता टेम्पो सरळ राजावाडी रुग्णालयात नेला आणि तिला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले. चौकीदाराच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.
हे ही वाचा -Mumbai Rape Case : साकीनाका बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीची झाली पाहिजे - देवेंद्र फडणवीस