मुंबई -टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी खुलासा केल्यानंतर या संदर्भातील तपास अजूनही सुरू आहे. हंसा ग्रुपकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये टीआरपीसंदर्भात दाखल झालेला गुन्हा मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयकडे तपासासाठी देण्यात यावा, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर प्रतिज्ञापत्र सादर करताना मुंबई पोलिसांनी या याचिकेला विरोध केला आहे.
मुंबई पोलिसांकडून योग्य तपास
टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून योग्य प्रकारे तपास केला जात असून हंसा ग्रुपकडून हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा, अशाप्रकारची याचिका करणे म्हणजे या प्रकरणातील मोठ्या आरोपींना मदत केल्यासारखेच आहे, असे मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयामध्ये म्हटले आहे. जे आरोपी आहेत किंवा ज्यांच्यावर टीआरपी घोटाळ्यासंदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे. अशांना कुठल्या संस्थेने या प्रकरणाचा तपास करावा हे सांगण्याचा अधिकार नसल्याचेही मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये म्हटले आहे.