मुंबई - मुंबई शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलिसांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमधील सवयीचे आरोपी, दरोडेखोर, फसवणूक करणारे, अपहरण करणारे, खंडणी मागणारे, अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीची हमी घेण्यासाठी आता 25 हजारापासून ते 50 लाख रुपया पर्यंतचा बॉण्ड लिहून घेण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडून राबवण्यात येणाऱ्या खास अभियानातून मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांमधील 3043 गुन्हेगारांची यादी बनवण्यात आली आहे.
मुंबई गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी नवीन अभियानयाअंतर्गत 3043 नामचीन गुन्हेगारांचा लेखाजोखा मुंबई पोलिसांकडे तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत त्यांच्यावर दाखल गुन्हे व त्यांनी केलेला शेवटचा गुन्हा, त्यांच्या दाखल प्रकरणातील शिक्षा किंवा निर्दोष सुटलेली प्रकरणे यासंदर्भातला आढावा घेऊन अशा आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचा बाँड लिहून घेतला जात आहे. या अगोदर केवळ पाच हजाराचा बॉण्ड लिहून घेतला जात होता. मात्र, या गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून आता यात बदल करण्यात आला आहे.
सीआरपीसी कलम 110, 102, 108, 107 त्यानुसार हा बॉण्ड लिहून घेतला जात असून मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांपैकी प्रत्येक पोलीस ठाण्यातील 25 नामचीन गुन्हेगारांची यादी बनवण्यात आली आहे.