मुंबई- सत्ताधारी शिवसेनेशी जुळवून घेत काही राजकीय वादग्रस्त कारवाईसाठी पुढाकार घेणारे आणि त्याचवेळी सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा सुधारावी यासाठी प्रयत्न करणारे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे 30 जूनला निवृत्त होणार आहेत. पांडे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ न मिळाल्यास पुढचे पोलीस आयुक्त कोण अशी चर्चा खाकी आणि खादीत रंगली आहे. पांडे यांच्या निवृत्तीनंतर बऱ्याच नावांची सुरू झाली असून त्यापैकी राज्य सरकार कोणाला कौल देईल याबाबत उत्सुकता आहे.
संजय पांडे यांनी मुदतवाढ मागितल्याचा इन्कार केला असला तरीही त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, राज्य सरकारने पाठवलेला मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडून मान्य झाला तरच पांडे यांना मुदतवाढ मिळू शकते. हेमंत नगराळे यांच्या कार्यकाळात लालफितीत अडकलेल्या फाईली काढून कारवाई करण्यासाठीच संजय पांडे यांना आयुक्तपदाच्या खुर्चीवर बसविण्यात आले होते. पांडे यांनी पद स्वीकारताच वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यासह केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरू असताना पांडे यांनी प्रवीण दरेकर, किरीट सोमैया, नवनीत राणा, मोहित कंबोज आदी प्रकरणात राज्य सरकारला अपेक्षित भूमिका घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पांडे यांच्यावरील आघाडी सरकारचा स्नेह कमी झाला.