मुंबई - अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणाचा तपास अहवाल मुंबई पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला सादर केला होता. हा गोपनीय अहवाल फक्त पाच ते सहा लोकांना माहीत होता. मुंबई पोलिसाच्या तपासावर आरोप करणाऱ्यांनी हा अहवाल काय होता हे सांगावे, असे आव्हान मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिले.
अभिनेता सुशांतसिंह मृत्यूबाबतचा मुंबई पोलिसांकडून तपास होत असताना त्याच्या कुटुंबीयांसह अनेकांनी साशंकता व्यक्त केली होती. मात्र, एम्सने अभिनेता सुशांतसिंहची हत्या नव्हे, आत्महत्या झाल्याची पुष्टी दिली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात आम्ही अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणाचा तपास दिला होता. आमच्या तपासात सर्वोच्च न्यायालयाला कोणतीही त्रुटी आढळली नाही. जे आमच्या तपासाला आव्हान देत आहेत, त्यांना मी आव्हान देतो, जे आम्ही तथ्य शोधली आहेत, त्याबाबत त्यांनी बोलावे. काहीही ज्ञान नसताना, ते आमच्यावर टीका करत आहेत. स्वार्थासाठी ते असे करत आहेत, असे पोलीस आयुक्त म्हणाले.
मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाचा अहवाल हा सर्वोच्च न्यायालयाकडे सीलबंद देण्यात आला होता. मुंबई तपासाचा अहवाल कुणाला माहीत होता का? कोणीही सांगावे, काय अहवाल होता? हे माझे आव्हान आहे, असे पोलीस आयुक्त यावेळी म्हणाले.