मुंबई - कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानीत संचारबंदी कायम असून लॉकडाऊनचा काळ हा 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, मुंबईत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना वाढतच आहेत. असाच एक प्रकार मुंबईतील वांद्रे येथील बेहरामपाडा येथे घडला आहे.
पोलिसाची कॉलर पकडून मारहाण करणाऱ्या एका आरोपीवर पोलिसांनी चांगलीच कारवाई केली हेही वाचा.....अखेर तळीरामांचा घसा होणार ओला; 'या' भागातील वाईन शॉप उघडण्यास सशर्त परवानगी
बेहरामपाडा येथील कटेंन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या गेट नंबर 18 जवळ 28 एप्रिल रोजी भाजीची गाडी लावणाऱ्या काही जणांना रोखण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडून त्यास मारहाण करण्याचा प्रयत्न तेथे केला गेला होता. यावर कारवाई करताना पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या काही जणांवर बळाचा वापर करून कारवाई केली आहे.
सोशल माध्यमांवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या संदर्भात पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणारा आरोपी हा दुबई येथून मुंबईत परतला आहे. सध्या त्याची कोविड 19 चाचणी केली जात असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.