मुंबई- शहरासह बॉलिवूडमध्ये अमलीपदार्थ विरोधी विभागाकडून कारवाई होत आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईतील डोंगरी परिसरातून एका महिलेला अमली पदार्थ तस्करी संदर्भात अटक केली आहे. या कारवाईत तिच्याकडून एक कोटी दहा लाख रुपयांचे एक किलो हून अधिक वजनाचे एमडी अमली पदार्थ जप्त केले आहे.
अमली पदार्थांसह 8 लाखांची रोकड जप्त-
या आरोपी महिलेकडून आठ लाख रुपयांची रोकड अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलेली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सनम तारीख सय्यद (25) असून ही महिला गेल्या काही महिन्यांपासून डोंगरी परिसरामध्ये अमली पदार्थाची तस्करी करत होती. अमली पदार्थविरोधी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून सदरच्या महिलेला ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता, तिच्या ताब्यातून 80 ग्रॅम अमली पदार्थ मिळून आले होते. त्यानंतर डोंगरी परिसरातील तिच्या घरी छापेमारी करण्यात आली. यामध्ये या महिलेच्या घरातून एक किलो एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच आठ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत ही 1 कोटी 10 लाख रुपये असल्याचे समोर आलेल आहे.
डोंगरी परिसरात असलेल्या इतर ड्रग्स पेडलरला अमली पदार्थ पुरविन्याचे काम ही महिला करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या अमली पदार्थांच्या तस्करीत आणखीन किती जण सहभागी आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.