मुंबई -मरिन ड्राईव्ह चौपटीजवळच्या एका बस स्टॉपच्या आडोशाला 15 दिवसांच्या बाळाला सोडून जाणाऱ्या मातेला आणि तिच्या भावाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी चर्चगेट ते खडवली रेल्वे स्थानकावरील तब्बल 100 सीसीटीव्ही फुटेज तपासून ही कारवाई केली आहे. सरोज सत्यनारायण सहारण आणि रामसेवक प्रेमलाल यादव, अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबात पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील सरोजचे विवाह राजस्थानमधील तिच्या दुप्पट वयाच्या एका व्यक्तीबरोबर झाला होता. गेल्या रक्षाबंधनावेळी सरोजचा भाऊ रामसेवक हा तिला भेटायला राजस्थानला गेला होता. मात्र, त्यावेळी मला येथे राहायचे नाही, मुंबईत घेऊन चल म्हणून सरोजने त्याच्याकडे आग्रह धरला. ती मुंबईला परत आली. त्यानंतर तिने आपण परत जाणार नाही, असा निर्णय घेतला.
श्रीमंत लोक घेऊन जातील म्हणून ठेवले बाळाला - दरम्यान, ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. तिने गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उशीर झाला होऊन अखेर तिने एका बाळाला जन्म दिला. पतीला आधीच सोडल्यामुळे तिने बाळाला आपल्याजवळ न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ती त्या बाळाला या ठिकाणी सोडून निघून गेली. विशेष म्हणजे यावेळी तिचा असा विचार होता की या भागात श्रीमंत लोक येथे सतत येत असल्याने ते या बाळाला घेऊन जातील. मात्र, त्याआधीच गेल्या 6 मे रोजी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौपाटीजवळच्या बस स्टॉपच्या आडोशाला कोणीतरी अज्ञाताने हे नवजात बाळ ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.