मुंबईकरांना वॉटर टॅक्सीची अजूनही प्रतीक्षाच.. कोरोनामुळे उद्घाटनाला मिळेना मुहूर्त - मुंबई वॉटर टॅक्सी उद्घाटन
संक्रांतीच्या मुहूर्तावर मुंबई आणि नवी मुंबईला जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सीचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते होणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वॉटर टॅक्सी उदघाटन कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे मुंबईकराना वॉटर टॅक्सीची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबई - संक्रांतीच्या मुहूर्तावर मुंबई आणि नवी मुंबईला जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सीचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते होणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वॉटर टॅक्सी उदघाटन कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे मुंबईकराना वॉटर टॅक्सीची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलसवर वॉटर टॅक्सी उभी -
मुंबईनजीकच्या शहरांतून सकाळी व गर्दीच्यावेळी येताना वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्ते वाहतुकीवरील ही कोंडी फोडण्यासाठी आणि पर्यावरण स्नेही म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी मुंबईच्या नजीकच्या शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी या जलमार्ग वाहतुकीची सुरूवात करण्याची घोषणा गेल्या वर्षी राज्य सरकारने केली होती. त्यानुसार महाराष्ट्र पोर्ट ट्रस्ट आणि सागरी महामंडळ युद्धपातळीवर कामाला लागले आहे. कोरोनामुळे जेट्टी उभारण्याच्या कामात अडथळा निर्माण झालेला होता. अगोदर कोरोनामुळे वॉटर टॅक्सी सुरु व्हायला उशीर झाला आहे. त्यातच आता मुंबई ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी चालविण्यासाठी सज्ज असताना सुद्धा फक्त उदघाटनासाठी ही वॉटर टॅक्सी डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलसवर उभी आहे.
कोरोनामुळे उद्घाटन कार्यक्रम लांबणीवर -
सागरी महामंडळाचा अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, संक्रांतीच्या मुहूर्तावर वॉटर टॅक्सीचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार होते. याबाबतची तयारी सुद्धा करण्यात आली होती. मात्र, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वॉटर टॅक्सी उदघाटन कार्यक्रम लांबणीवर पडले आहे. मुंबईतील कोरोना परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर प्रत्यक्षपणे उदघाटन कार्यक्रमाबाबत सांगणे शक्य होणार आहे.
..अशी असणार वॉटर टॅक्सीची सेवा -
सागरमाला उपक्रमांतर्गत देशातील समुद्रकिनार्यांचा उपयोग करून जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली आहे. त्यामाध्यमातून मुंबईच्या नजीकच्या शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी सुरु करण्याची घोषणा सरकारने केली होती. यामध्ये १२ वॉटर टॅक्सीचे मार्ग असून यापैकी मुंबई ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी लवकरच सुरु होणार आहे. विशेष म्हणजे ही योजना मुंबई पोस्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरीटाईन बोर्ड आणि सिडको मिळून राबिवित आहे. वॉटर टॅक्सी सेवा चालविण्याची जबाबदारी इन्फिनिटी हार्बर सर्विस आणि वेस्ट कोस्ट मरिन या दोन खासगी कंपनीला दिली आहे. पहिल्या टप्प्यात ३२ आसनी, ४० आसनी आणि ५० आसनी अशा तीन वॉटर टॅक्सी मुंबई-नवी मुंबई- एलिफंटा या मार्गावर चालवण्यात येणार आहे.