मुंबई -मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. आज मुंबईत परदेश प्रवास केलेले ५ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३६ झाली आहे. त्यापैकी १९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा -नवजात बालक मृत्यू प्रकरण - बालकांचा मृत्यू इन्फेक्शनमुळे, पडसादानंतर पालिकेची चौकशी समिती नियुक्त
रुग्णांचा आकडा ३६ वर -
मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून ११ हजार २९५ प्रवासी आले. त्यापैकी ४८ प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १ नोव्हेंबरपासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात ७९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांच्या अतिजोखमीच्या सहवासातील १९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ( एनआयव्ही, पुणे ) येथे जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत ३६ ( २१ पुरुष, १५ स्त्री ) जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ३६ पैकी १९ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत.