मुंबई - मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत परदेश प्रवास केलेले २७ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून ( Mumbai omicron update ) आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. त्यापैकी ३४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा -'दगड' प्रदर्शनातून भूगर्भिय बदल अन् मानवी स्वभावाची सांगड घालण्याचा प्रयत्न
रुग्णांचा आकडा ७४ वर -
मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून १२ हजार ३४१ प्रवासी आले. त्यापैकी ६४ प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १ नोव्हेंबरपासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात १२४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या अतिजोखमीचे सहवासातील २२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही, पुणे) येथे जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत ७४ (४१ पुरुष, ३३ स्त्री) जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. एकूण ७४ पैकी ३९ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत.
नागरिकांनी भीती बाळगू नये -
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरूप वर्तनाचा अंगिकार करावा. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.
हेही वाचा -New Traffic Rules : 'हे' 50 वाहतूक नियम मोडल्यास कोर्टाच्या चकरा माराव्या लागणार