महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'पाठबळ देणारे शेजारीच माझे कुटुंब', महिला पोलीस योद्ध्याची कोरोनामुक्त झाल्यावर भावना

वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यात सलग 45 तास ड्युटी करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. कोरोनावर मात करून घरी परतल्यानंतर झालेले स्वागत पाहून त्या भारावून गेल्या. त्यांनी या संकटात साथ देणाऱ्या सर्व शेजाऱ्यांचे आभार व्यक्त करत 'तुम्हीच माझे कुटुंब आहात,' अशी भावना व्यक्त केली.

'पाठबळ देणारे शेजारीच माझे कुटुंब', महिला पोलीस योद्ध्याची कोरोनामुक्त झाल्यावर भावना
'पाठबळ देणारे शेजारीच माझे कुटुंब', महिला पोलीस योद्ध्याची कोरोनामुक्त झाल्यावर भावना

By

Published : May 17, 2020, 12:35 PM IST

मुंबई - कोरोनाच्या युद्धात जनतेने घरात राहावे यासाठी चौका-चौकात पोलीस पहारा देत आहेत. मात्र, या कोरोनाच्या संकटात अनेक पोलीसच बाधित झाल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत मुंबईत 10 पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. अशातच सकारात्मक बाब म्हणजे निर्मल नगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबल कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतल्या. या कोव्हिडविरोधातील लढाई जिंकणाऱ्या पोलीस योद्ध्याला स्थानिक रहिवाशांनी सॅल्युट करून व टाळ्या वाजवून स्वागत केले. तर, त्यांच्या मुलांनी आपल्या आईवर पुष्पवृष्टी केली.

वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यात सलग 45 तास ड्युटी करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा अहवालही पॉझिटिव्ह आला. घरच्यांना फोनवरून अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आपल्या कपड्यांची बॅग तयार ठेवण्यासही सांगितले. त्यानंतर तशाच ड्युटीवरून बॅग घेऊन थेट वरिष्ठांनी केलेल्या सूचनेप्रमाणे अंधेरीच्या सेव्हन हिल रुग्णालयात त्या दाखल झाल्या.

मात्र घरात दोन मुले, आई आणि पोलीस कॉन्स्टेबल असलेले पती यांची चिंताही होती. ओशिवरा पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या त्यांच्या पतीलाही वरिष्ठांनी विलगीकरणात राहण्याच्या सूचना केल्या. वरिष्ठ पोलिसांच्या मदतीने जोगेश्वरीत आयोजित पोलिसांसाठीच्या शिबिरात सर्व घरच्यांची चाचणी करण्यात आली आणि सुदैवाने सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. हे सर्व घरीच विलगीकरणात राहिले.

कोरोनावर मात करून घरी परतल्यानंतर झालेले स्वागत पाहून या महिला पोलीस कॉन्स्टेबल भारावून गेल्या. त्यांनी या संकटात साथ देणाऱ्या सर्व शेजाऱ्यांचे आभार व्यक्त करत 'तुम्हीच माझे कुटुंब आहात,' अशी भावना व्यक्त केली. या संकटाच्या काळात आमच्या पोलीस खात्यातील सर्वांनी व शेजाऱ्यांनी मानसिक आधार दिला तो केव्हाच विसरणं शक्य नाही, असे त्या म्हणाल्या. या कोरोनाच्या संकटसमयी खचू नका धीर सोडू नका यावर आपण यशस्वी मात करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details