मुंबई -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज गुरूवारी ईडी मुख्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्ते आक्रमक होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईत ईडी मुख्यालयासहीत सर्वत्र जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसेच दक्षता म्हणून दादर, मरिन ड्राईव्ह, दक्षिण मुंबई या भागात जमावबंदीचे 144 कलम लागू करण्यात आले आहे.
ई़डी मुख्यालयासहीत संपूर्ण मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी
कोहिनूर मिल प्रकरणी चौकशीसाठी राज यांना आज बोलावले आहे. साधारण अकराच्या सुमारास राज ठाकरे ईडी कार्यालयात जाणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना व नेत्यांना 149 ची नोटीस दिलेली आहे. परंतु कार्यकर्ते याला न जुमानताही एकत्र येतील त्यामुळे मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
राज ठाकरे यांच्यावरील ईडीची चौकशीची नोटीस दिल्यानंतर ठाण्यातील एका कार्यकर्त्याने तर आत्महत्या केली. अनेक मनसे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत. राज ठाकरे यांना कटकारस्थान करून चौकशी लावली आहे, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. यामुळे मुंबईत जागोजागी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे. तर काही मनसे नेत्यांना गुरूवारी सकाळीच पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे.