मुंबई -शहरात गणेशोत्सव दरम्यान दीड, पाच, सात आणि दहा असे विविध दिवस गणेशाचे विसर्जन करण्यात येते. यावेळी गणेश विसर्जन दरम्यान पुष्पहार, फुले आदींचे निर्माल्य पालिकेने ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशात जमा करण्यात आले. असे एकूण १०८२ टन इतके निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्यापासून खत निर्माण करून त्याचा वापर उद्यानात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा... तब्बल 24 तास चालली पुण्यातील विसर्जन मिरवणूक; साडेसात हजार पोलीस बंदोबस्तात मिरवणूक निर्विघ्न पार
मुंबईत गणेश विसर्जन सुरळीत पार पडावे म्हणून महापालिकेने समुद्र, खाडी, नैसर्गिक तलाव आदी ६९ ठिकाणी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी ३२ कृत्रिम तलाव अशा एकूण ११२ ठिकाणी २४२ निर्माल्य कलश ठेवले होते. त्यामध्ये, एकूण १० लाख ८२ हजार १८६ किलो निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य पालिकेने काही स्वयंसेवी संस्थाच्या मार्फत त्याचे खतात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. या खताचा वापर पालिका उद्यानात करण्यात येणार आहे. ३३ ठिकाणी या निर्माल्याचे वर्गीकरण करण्यात येत असून या निर्माल्याचे खतात रूपांतर करण्याची प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.