मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे दररोज हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात असल्याने आणखी लॉकडाऊनची गरज नाही. तसेच मुंबई शेजारील जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आल्यावर लोकल ट्रेनमध्ये सामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा दिली जाईल, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.
मुंबईत कोरोनाचा रुग्ण मार्च महिन्यात आढळून आला होता. 22 मार्च पासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हा पासून आतापर्यंत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टच्या बसेस, लोकल ट्रेन चालवल्या जात आहेत. मुंबईतील अनेक व्यवसाय, कार्यालये बंद आहेत. यामुळे मुंबईचे आणि राज्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 67 दिवसांवर तर रुग्ण बरे होण्याचा दर 73 टक्क्यांवर पोहचला आहे. पालिकेची आणि खासगी रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड रिक्त आहेत. यावरून कोरोना नियंत्रणात आला असल्याने आता लाॅकडाऊनची गरज नाही, असे स्पष्ट संकेत पालिका आयुक्तांनी दिले. आता मुंबई शेजारील जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आला, तर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात येईल, असे संकेत पालिका आयुक्तांनी दिले आहेत.